06-08-2015 - 30-08-2015

प्रिय रोटरीयन्स व अॅन्स, "अनादि मी । अनंत मी ॥" क्रांतिकारकांचे सेनापती, स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ, सक्रीय हिंदू संघटक, क्रियाशील धर्म सुधारक व समाज सुधारक, प्रेरणादायी महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्र शस्त्रसज्जता या बाबत प्रखर विचार मांडणारे विचारवंत अर्थात आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! तीव्र बुद्धीमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेल्या या असाधारण व्यक्तिमत्वाच्या बालवयातच राष्ट्रवाद आकार घेत होता. उन्मत्त ब्रिटीश सेनेशी झगडणाऱ्या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त या बालमनाला अस्वस्थ करत होते. देशभक्ती व देशप्रेम यांनी भारलेल्या आणि मातृभूमीचे स्वातंत्र्य या एकमेव ध्येयाने पछाडलेल्या या युवकाने वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली: "देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता, मरेतो झुंजेन. . . . जर यशस्वी झालो तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेन. . . . हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घालेन!" अंगावर काटा आणणारे हे तीरासमान शब्द. एक क्रांतिकारक, श्रेष्ठ व ज्येष्ठ साहित्यिक, समाजसुधारक व हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला. स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व योगदान दिले, स्वातंत्र्य व सुराज्य यासाठी अथक परिश्रम घेतले व त्या साठीच आपले आजीवन त्यांनी वाहून घेतले. या महान स्वातंत्र्य सेनानीला, एका थोर वीरपुरूषाला आदरांजली म्हणून, या थोर विचारवंताचे समाजाला प्रेरणादायी ठरणारे, समाजसुधारवादी असे प्रखर विचार आजच्या समाजात, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचावेत या हेतूने रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांजकडून आयोजित "अनादि मी । अनंत मी ॥" हा खास सावरकरांच्या जीवनपटावर आधारित एक विशेष लक्ष्यवेधी प्रयोग. रोटरी ही समाजसेवेला समर्पित विविध सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवलेली, गेली ११० वर्षे कार्यरत असणारी एक अग्रगण्य व नामांकित अशी आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था. जगातील पोलिओ या रोगाच्या निवारणासाठी रोटरी या संस्थेने सिंहाचा वाटा उचललेला आहे. सावरकरांसारख्या अनेक क्रांतीकारांनी लढा देत आपल्याला बहाल केलेल्या स्वराज्यात सुराज्य निर्माण करणं व राखणं हे या समाजाचा नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि सामाजिक समस्यांच्या निवारणासाठी हातभार लावणे हे रोटरी आपलं कर्तव्य मानते. या आयोजित नाटकाच्या प्रयोगाच्या माध्यमातून संकलित होणारा निधी रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड त्यांच्या आगामी अनेकविध सामाजिक प्रकल्पांसाठी उपयोगात आणणार आहे. आपण सर्वांनी "अनादि मी । अनंत मी ॥" या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहून जे आर्थिक योगदान समाज उद्धाराच्या कार्यासाठी केले आहे त्या प्रती क्लबच्या वतीने आम्ही सर्व सभासद आपले मनःपूर्वक आभारी आहोत व शतशः ऋणी आहोत. सावरकरांच्या समाजसुधारक विचारांची प्रेरणा कायम उराशी बाळगत, सामाजिक प्रगतीच्या कार्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही, आम्ही या स्मरणिकेच्या माध्यमातून देऊ इच्छितो. चला तर आपण परत भेटूयात, दिनांक: ३०-ऑगस्ट-२०१५ वेळ: रात्री ८.०० वाजता स्थळ: टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे-४११०३० ड्रेस कोड: लेडी रोटरीयन्स व अॅन्स - जरीच्या काठ पदराच्या साड्या (शक्यतो हिरव्या रंगाच्या) आणि जेन्ट्स रोटरीयन्स व अन्नास - वर्षा सहलीत दिलेले टी-शर्ट्स. या शिवाय, आपणास कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगीत बॅजेस दिले जातील. तेव्हा सर्वांनी जरूर या व मनमुराद आनंदी क्षणांचे धनी व्हा!!! आपल्या अमुल्य सहकार्यासाठी पुनःश्च धन्यवाद.

Project Details

Start Date 06-08-2015
End Date 30-08-2015
Project Cost 175000
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 100
Partner Clubs None
Non Rotary Partners
Project Category -